स्वयंभू देवस्थान श्रीक्षेत्र पिनाकेश्वर मोठा महादेव जातेगांव मंदिरावर लेख

First slide

स्वयंभू देवस्थान श्रीक्षेत्र पिनाकेश्वर मोठा महादेव जातेगांव मंदिरावर लेख

जातेगांव येथील पिनाकेश्वर तथा मोठा महादेव हे तीर्थ स्थान स्वयंभू असून अत्यंत पुरातन आहे,  जाज्वल्य धार्मिक अधिष्ठान व परम्परा असलेले पिनाकेश्वर नावाचे हिंदुस्थानातील एकमेव महादेवाचे स्थान आहे,  इथल्या सर्वच धार्मिक परम्परा,  प्रथा जातेगावकर ग्रामस्थ यांनी  जागविल्या,  जिवंत ठेवल्या,  वाढविल्या आहेत,  त्यामुळे जातेगावच्या भूमीशी नाळ असलेले जातेगावकर कुठेही असले तरी नतमस्तक होऊन जन्मभूमीशी नाते जपतात, 

हे स्थान अत्यन्त जाज्वल्य असल्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर प्रेम प्रातांतील भाविक पुरातन काळापासून येथे येऊन श्रद्धेने नतमस्तक होतात,  

     जातेगावपासून उत्तरेला 5 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरशिखरावर मोठा महादेवाचे पुरातन स्थान आहे, 

त्याठिकाणचा  सर्व कारभार सुरुवातीपासूनच जातेगावचे ग्रामस्थ पाहतात, 

1962 साली त्याठिकाणी असलेले मंदिर दक्षिण दिशेला एका बाजूला कोसळले होते, त्यामानाने त्याठिकाणी असलेला सभा मंडप शाबूत होता,  मंदिर बांधण्याचे अवघड काम होते,  त्यासाठी जातेगांव ग्रामस्थ यांनी,  मंदिराची उभारणी कशा पद्धतीने करता येईल याबाबद डोंगरावर व गावात बैठका घेऊन निर्णय घेण्यास सुरुवात केली होती,  काम अत्यंत अवघड होते,  कारण डोंगरावर सर्व साहित्य पोहचविणे खूपच अवघड होते,  पण गावाने निर्णय घेतला होता, 

कै,  काशीनाथ पाटील तथा काकासाहेब, काशीनाथ दादा मेहतर,  पंढरीनाथ भिवसेन बंड,  काशिनाथ श्रावण पवार,   नामदेव धनगर,  चांदभाई शेख,  गंगाभाऊ भगत ,  कचरू आप्पा डोखे ,  गजानन म्हसू पवार,  हरिभाऊ मास्तर पवार, काशिनाथ व्यवहारे,  भिवाजी लाठे आदी तत्कालीन मान्यवर गावाचे कारभारी होते, हे सर्व गावकऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेत होते,  डोंगरावरील मंदिर उभारणीचे लक्ष्य गावकऱ्यांसमोर होते, 

       मे  महिन्यात 1963 साली श्री संत जनार्दन स्वामी यांचे जातेगावी आगमन झाले ,  दुपारच्या बसने बाबा नामदेव मामा यांचे हॉटेल जवळ उतरले,  बाबांचे सूचनेनुसार त्यांना श्री शामराव बाजीराव चव्हाण व उत्तम वामन चव्हाण या शाळकरी मुलांनी महादेवाचे मंदिरात आणून सोडले,  

महादेवाचे दर्शनासाठी येणारे भाविक,  साधू संत नेहमीच मंदिरात थांबत असत,  नेहमीप्रमाणे एक साधू संत मंदिरात आल्याने गावकर्यांनी त्यापद्धतीने त्यांची मंदिरात व्यवस्था केली, 

बाबाजी दोन अडीच दिवस मंदिरात होते, मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक यांच्याशी ते चर्चा करीत होते, 

अंधार पडल्यानंतर गावातील पहिलवान श्री जगन्नाथ कासार पहिलवान,  ज्ञानेश्वर वस्ताद,  गोटीराम परदेशी,  काभूअण्णा मेनकर यांच्या नेतृत्वाखाली गावातील तरुण तालीम करण्यासाठी मंदिरात येत असत, 

श्री जनार्दन स्वामी अंदरसूल येथून जातेगावी आले,  हा ईश्वरी संकेत असेल,  श्री पिनाकेश्वर भगवान यांनीच बाबाजींकडे बोट दाखवून हे काम त्यांना करण्याची आज्ञा केली असेल, 

        बाबाजी यांनी श्री जगनाथ पहिलवान व त्यांचे सहकारी यांचेकडे मला डोंगरावर सोडा म्हणून इच्छा प्रदर्शित केली,  बाबाजी एका पायाने अधू होते,  त्यांना चालताना त्रास होत होता, 

जगन्नाथ पहिलवान यांनी गोटीराम परदेशी यांचे बैलगाडीत डोंगराच्या पोटापर्यत नेवून सोडले, सोबत जंगलू भावडू वगैरे गावातील तरुण कार्यकर्ते होते,  बाबाजी स्वतः अत्यन्त अवघड वाटेने डोंगर चढून गेले, त्याठिकाणी बाबांनी राहण्याची इच्छा व्यक्त केली, 

खरं तर त्यावेळी डोंगरावर कोणीही कधीही मुक्काम करीत नव्हते, मात्र बाबांनी ते धारिष्टय दाखविले, 

बाबांनी मंदिराची तात्युरत्ती डागडुजी करण्याऐवजी मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे सांगितले, गावकर्यांनी त्यास अनुकूलता दर्शविली, 

दरम्यान बाबाजींचा आहार फक्त दूध होता,  डोंगरावर टी व्यवस्था नव्हती,  गावातून त्यांना  तरुण शाळकरी मुलामार्फत दूध पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली,

हळूहळू काम सुरु करुन मंदिराचे ढिगारे उपसण्यास सुरुवात करण्यात आली होती,  बरेच भाविक त्याठिकाणी श्रमदान करण्यासाठी मुक्कामास  थांबु लागले,  त्याठिकाणी सुरुवातीला स्वयंपाक घर वगैरे नव्हते, त्यांच्या  व त्याठिकाणी श्रमदान करण्यासाठी येणाऱ्या भाविक यांची भाकरीची सोय गावातून करण्यात आली,  टी जबाबदारी पुंजा बाबा घोडके यांचेवर देण्यात आली,  याबाबद गावात दवंडी देण्यात आली,  

त्यानुसार पुंजाबाबा घोडके  मोठी पाटी घेऊन प्रत्येक गल्लीत आवाज देत, 

डोंगरावरच्या भाकरी आणा माउल्यानो आवाज ऐकताच महिला भाजी भाकरी जे असेल ते तयार करुन ठेवलेले पाटीत आणून ठेवत असत,  सर्वांना आनंद वाटतं होता,  त्या भाजी भाकरीच्या पाट्या डोंगरावर पोहच केल्या जात होत्या,  ही प्रथा काही दिवस चालू होती,  नंतर त्याठिकाणी भांडार गृह  (स्वंयपाक घर )   चालू करण्यात आले,  महिलाही त्याठिकाणी मुक्कामाला थांबू लागल्या,  आवश्यक तो किराणा व वस्तू त्या ठिकाणी गावकऱ्यामार्फत पोहच होऊ लागल्या,

तरीही मंदिर जीर्णोद्धार व भाविक यांची सोय करण्याची जबाबदारी गावकरी यांचेवर होती,   

 मंदिर जिर्णोद्दार व बाबाजी यांचे सम्बधी वर्मनपत्रात बातम्या देऊन प्रशिध्दी देण्यात येत होती,  गावातले ग्रामस्थ अगदी निरपेक्ष भावनेने याकामी गुंतले होते,  आजूबाजूच्या गावच्या लोकाना व भाविक यांना याबाबद माहिती व्हावी म्हणून पुंजा बाबा घोडके यांचे नेतृत्वाखाली शाळकरी पोरांची टीम प्रचारक म्हणून काम करीत होती, 

 मीस्वतः  बद्रीनाथ वाळेकर,  श्री शामराव पाटील,  शंकर  सोनवणे,  रामदास शिंदे,  वसंत सोनवणे,  दशरथ उगले,  नाना  लाठे,   रामदास काळे,  कचरू परदेशी वगैरे शाळकरी पोर पुंजा बाबा घोडके यांच्या बरोबर ढेकू,  कुसूमतेल, वाकला,  बाभुळतेल,  गोंडेगाव,  रोहिले,  जवळकी,  आडगाव वगैरे गावात प्रचारासाठी जात होतो, 

गावातल्या चौकाचौकात भजन गाऊन प्रचार केला जात होता,  पुंजाबाबा डोंगरावर मोठे साधू पुरुष आलेले असून त्यांना रिद्धी सिद्दी प्राप्त आहे,  त्यांनी डोंगरावर मोठा महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेतले असून महाराज यांच्या दर्शनाचा  लाभ घेऊन मंदिर जिर्णोद्दारास मदत करावी असे आवाहन केले जात होते,  अशाच  पद्धतीचे आवाहन पत्रक छापून केले जात होते,  परिणामी डोंगरावर भाविकांची गर्दी वाढू लागली होती,  प्रत्येक शिवभक्ताला या पवित्र मंदिर उभारणीचे कामात आपला हातभार लागला पाहिजे व बाबाजी यांचे आशीर्वाद मिळाले पाहिजे असे वाटू लागले होते,  परिणामी जबरदस्थ धार्मिक लाट व वातावरण तयार होउन मंदिर जिर्णोद्दाराच्या प्राथमिक तयारीचे कामास वेग आला होता, 

 

आपण डोंगरावर गेल्यानंतर मंदिराच्या कलशाचे प्रथम दर्शन घेतो, तशी प्रथाच आहे,  आपण मंदिराच्या कलशाचे दर्शन घेतो,  भव्य मंदिराकडे श्रद्धेने पाहतो,  विनम्र होतो,  मात्र मंदिराच्या पायाच्या ज्या   दगडावर ते देवालय उभे आहे,  तिकडे आपले लक्ष जात नाही,  मात्र अध्यत्माच्या इतिहासात त्याची नोंद असते, 

या मंदिर उभारणीचे नवनिर्माणात अनेक शिवभक्त यांचे सर्वथैव योगदान आहे, 

मंदिर उभारणीचे व बांधकाम याचे काम बळीराम मिस्तरी यांचेकडे देण्यात आले होते,  दरम्यान त्या ठिकाणी यात्रेकरू याचे निवासासाठी निवाऱ्याची अनेक छोटी मोठी कामे चालू होती, त्यासाठी अनेक हात श्रमदान करीत होते, 

 मंदिर कशा पद्धतीचे असावे यासाठी महाराष्ट्रातील विविध मंदिरे यांचे फोटो व नकाशे तयार केले जात होते,  श्री संत जनार्दन स्वामी यांच्या कल्पनेतील शिव मंदिर त्यांचे सूचनेनुसार साकारण्याचा निर्णय त्यावेळी जातेगांव ग्रामस्थ यांच्यावतीने घेण्यात आला होता,

मंदिरासाठी लागणारा दगड व ते दगड घडविणारे कुशल कारागीर यांची गरज होती,  पक्क्या दगडाचा प्रश्न सोडविण्यात आला होता,  मंदिरासाठी दगड घडविणारे कुशल कारागीर तलवाडा,  भारम,  कोलम ,  वडजी रहाडी येथून मिळविण्यात आले होते,  त्यापैकी बरेच दगड घडविणारे कारागीर हे मुस्लिम होते,

बळीराम मिस्त्री व सर्व कारागीर यांची निवासाची स्वतंत्र पणे व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आली होती, त्यांना लागणाऱ्या वस्तू त्यांना पुरविल्या जात होत्या,

दररोजच यात्रा  भरत होती,  भाविक दर्शनासाठी व बाबांचे आशीर्वाद घेऊन   श्रमदान करण्यासाठी आसुसलेले होते, 

वेगवेगळ्या ठिकाणी कामे

 चालू होती,  कार्यकर्ते व भाविक यांची विभागणी करुन कार्य चालू होते, 

या सर्वांचे नेतृत्व श्री जगन्नाथ पहिलवान यांचेकडे होते, नंतर त्यांना जगन बाबा ही उपाधी मिळाली,  या माणसाने जीवनाचे काही वर्ष त्याठिकाणी नवनिर्माण करण्यासाठी खर्ची घातले,   त्यांच्या एकाच आवाजाने भाविक त्यांच्या दिशेने धावत होते,  त्यांचा पहाडी आवाज पहाडात घुमत होता, 

चला आरतीला

खाली श्रमदान करायला चला,  बाबाजी तिथे तुम्हांला दर्शन देतील

या फार छोट्या गोष्टी आहेत, मात्र त्यात गर्दीला व भाविक यांना वळविण्याची ताकद होती,  

अनेक शिवभक्त भक्ती भावाने सेवा करीत होते,  बाबांची कीर्ती सर्वदूर पोहचली होती,   त्याच काळात स्वामींनी अनेक शिवभक्तांना अनुग्रह देण्यास सुरुवात केली होती,  

अनेक शिवभक्त यांनी बाबाजी यांचेकडून अनुग्रह घेऊन सात दिवसाचे अनुष्ठान केले होते,  बाबाजी यांना गुरु करणऱ्यांची संख्या सातत्याने वाढत होती,  त्यामुळे त्याठिकाणी नियमित अनुष्ठान केले जात होते, 

बाबाजी यांची नित्य नियमाने सेवा करणारे काही  शिवभक्त बाबाजी यांचे अगदी निकट होते, जातेगांव येथील श्री पुंजाबा शिवराम पवार ( माळी  ) हे बाबाजी यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या प्रमुख सेवेकरी यांच्यापैकी एक होते,  स्वामींनीच त्यांचे नाव पुंजाबा ऐवजी शांताराम असे ठेवले,

बाबाजी यांचा लौकिक व नाव सर्वदूर पोहचले होते,  दिवसरात्र त्याठिकाणी गर्दी वाढत होती,  योग्य ते नियोजन केले जात होते, 

सगळीकडे पावित्र्य व मांगल्याचे वातावरण व सूर  उमटत होते,  गावागावात व पंचक्रोशीत  जनार्दन स्वामी यांचा जयजयकार होत होता,  धार्मिकतेचा प्रभाव वाढला होता,  लोक भक्ती मार्गाकडे वळले होते,  सगळ्यांच्या कपाळावर भस्माच्या पट्टया दिसत होत्या,  कधी कधी नमस्कार चमत्काराच्या घटना ऐकायला मिळत होत्या,  लोंकाची,  भक्तांची श्रद्धा वाढीस लागली होती,  बाबाजी यांचे दर्शन व प्रवचन यांचेसाठी गर्दी होऊन रांगा लागत होत्या,  दुपारच्या आरती साठी अक्षरशः झुंबड उडत होती,  कारण दुपारच्या आरती नंतर स्वामींचे प्रवचन नियमित पणे होत असत,  ????????️

काही भाविक आपले प्रश्न घेऊन बाबाजी यांचेकडे येत, अगदी आजारपणापासून कौटूंबिक वा अन्य प्रश्न सांगत असत, पण बाबाजी सर्वाना सांगत बाबांनो,  बाबाजीला काही मंत्र तंत्र येत नाही, भगवंतावर विश्वास ठेवात्याची सेवा करा,  *सन्मार्गाला लागा,  ती  विभूती घ्या

श्रद्धा ठेवा,  तो तुमचे चांगले करील

ही बाबाजी यांची वाणी होती,  त्याचा परिणाम चांगला व्हायचा,  अनेक सन्मार्गाला लागले,  अनेकांचे आजार बरेही झाले,  काहींचे प्रश्न सुटले,   ही श्रद्धेची आणि अध्यात्माची ताकद होती,

बाबाजी यांनी शिव भक्ताना दिलेला भक्तीचा संदेश आणि ईश्वरी सेवा  ही संकल्पना प्रत्यक्ष मूर्तरूप धारण करीत होती आणि त्या जोरावर पिनाकेश्वर मंदिराचे जिर्णोद्दाराचे काम वेग घेऊन आकारास  येत होते, 

 

महादेवाचे डोंगरावर जाण्यासाठी दोन रस्ते,  एक सातपायऱ्याचा रस्ता,  हा रस्ता करळ असून मंदिरावर पोहचण्यासाठी भाविक अधिक संख्येने सुरुवातीपासून याच रस्त्याचा वापर करतात, गावातील दंडवते,  तिसऱ्या सोमवारी जलाभिषेक करण्यासाठी भोपळे घेऊन येणारे भोपळेधारी ( गंगेचे पाणी )याच रस्त्याने जाण्याची प्रथा आहे,  जनार्दन स्वामी यांनी काही ठिकाणी असलेला करळ  रस्ता सरळ केला होता, 

दुसरा रस्ता घोड रस्ता,  दुधाळ टेकडीच्या खालच्या बाजूने हा रस्ता मंदिराकडे जातो,  हा रस्ता खूपच चिवळ व एका वेळी फक्त एकच माणूस चालू शकेल असा रस्ता होता,  काही ठिकाणी अक्षरशः पान्धी होती,  त्यातून वाट काढत जात असतांना खाली खोल दरी , अशी भयावहता होती,  हा रस्ता दूर अंतराचा असला तरी काही भाविक त्या रस्त्याने जाणे सुद्धा पसंत करीत व आनंद घेत असत, 

या रस्त्याला घोड रस्ता असे नाव का पडले याबाबद जुने लोक सांगत असत, 

त्या रस्त्याने फक्त घोडेस्वारच जाऊ शकेल एवढी ती वाट अरुंद होती, त्या रस्त्यावर अगदी वळणावर घोड्याचे खूर्र असल्याचे खड्डे आहे,  कदाचित पाण्याच्या प्रवाहामुळे,  निसर्गतः निर्माण झाले असेल, मात्र त्याचा संबंध घोड रस्त्याशी जोडला गेला हे मात्र नक्की, 

या रस्त्याच्या बाबतीत अजून एक माहिती जुने लोक सांगत असत,  त्याची इतिहासात नोंद नसेल, " छत्रपती शिवाजी महाराज उत्तरेकडे स्वारीसाठी त्याच रस्त्याने मार्गस्थ झाले होते," शिवाजी महाराज व त्यांचे घोडेस्वार त्या रस्त्याने गेले म्हणून त्या रस्त्याला घोड रस्ता म्हणतात,  ही दंतकथा होऊ शकत नाही,  कारण डोंगर ओलांडून पलीकडे जाणेसाठी हाच रस्ता होता, 

मंदिराचे पूर्व दिशेला खाली सपाटीला एक छोटा तलाव होता,  त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही काळ राहुट्या पडल्या होत्या,  नंतर शिवाजी महाराज  खाली पाटणा देवीमार्गे मार्गस्थ झाले,  हा इतिहास जुने लोक सांगत असत,   हा सांगावा तत्कालीन पिढीकडून सांगत सांगत आपल्या पर्यत आला आहे,

 माणसाला गाढवाची उपमा का देतात हे एक कोढे आहे,

पाठीवरून ओझे वाहून नेण्याचे काम हा प्राणी अत्यंत प्रामाणिकपणे करतो,  डोंगरावर उंच शिखरावर सिमेंट,  वाळू, दगड, किराणा सामान अवजड वस्तू सुरुवातीचे काम सुरु झाले तेंव्हा,  गाढवाच्या मार्फतच झाले होते, हे नमूद करणे गरजेचे आहे, त्यावेळी काही सेवकही स्वतःच पाठीवरून अवजड सामान वरती घेऊन जात होते,  त्यामुळे गाढवाला कमी लेखण्याची अथवा माणसाला प्रामाणिकता जपणाऱ्या गाढवाची उपमा देणे चुकीचे ठरेल,  

डोंगरावर भक्त निवास,  भांडारगृह,  निवासासाठी खोल्या,  श्री संतजनार्दन स्वामी यांची कुटी,  अनुष्ठान करणारे भाविक यांचेसाठी व्यवस्था आदी कामे भक्तांचे मार्फत बाबाजी करून घेत होते, त्यासाठी लागणारे दगड माती उत्तरेकडे एक खाण तयार करुन त्याचा वापर केला जात होता,  त्यासाठी लागणारे अथवा जळणासाठी लागणारे लाकूड तेथूनच उपलब्ध केले जात होते, 

दरम्यान बाबाजी यांनी घोडरस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते,  जेणेकरून भाविकांना वाहनासह डोंगरावर किमान सपाटीपर्यत पोहचणे शक्य होईल, 

हळू हळू सुरुवातीला तो काहीसा रुंद केला गेला,  त्यामुळे भाविक यांना वरती चढणे सोपे झाले होते,

फार मोठया प्रमाणात यंत्र  सामुग्री नव्हती,  यंत्र सामुग्री नव्हतीच असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही, 

नंतर रस्ता अधिक रुंदीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला,  अक्षरशः डोंगरच अपुऱ्या सामग्रीवर कोरण्याचा तो निर्णय होता,  बाबाजी स्वतः त्या कामावर थांबून काम करुन घेत होते,  सूचना करीत होते,   शेकडो हात त्या कामात दिवस रात्र  गुंतत  होते,  बाबाजी यांचा आदेश मानीत होते,  एकच ध्येय ही शिवाची सेवा आहे, 

रस्ता रुंदीकरण म्हणजे तोड फोड आली,  झाडाची तोड करणे आले,  त्यामुळे रस्त्याला  अडचण ठरणाऱ्या अनेक वृक्षाची तोड करणे आलेच, 

 हे सगळं चालू असतांना एक घटना घडली,  चाळीसगाव हद्दीतुन खाणीतून काढलेले दगड व केलेली वृक्ष तोड,  घोड रस्ता रुंदीकरण करतांना पोखरलेला डोंगर,  अनेक झाडांची केलेली तोड,  याबाबद वनक्षेत्र पाल  यांनी केलेल्या तक्रारीनुसार अथवा शासकीय कर्तव्यामुळे म्हणा,  याबाबद चौकशी चालू झाली होती,  अर्थात शासकीय पातळीवरील ते काम योग्य होते, 

 एक दिवस जातेगांव येथील  वनक्षेत्र पाल यांचेकडे संबंधित शासकीय अधिकारी आले,  त्यांना कै,  काका पाटील यांच्या वाड्यावर बोलाहून घेण्यात आले,  त्यावेळी तशी प्रथाच होती, गावात कोणीही अधिकारी आला तर त्याला अगोदर पाटलाच्या वाड्यावर जावे लागत असे, 

तिथे काय चर्चा झाली माहित नाही,  पण ते अधिकारी आल्या पावली परत गेले, 

महादेवाचे डोंगरावर पुरातन काळातील दोन पाण्याचे टाके होते,  एवढ्या  उंचावर असतानाही पाणी कधी कमी पडत नव्हते,  जिंवत पाणी होते,

एक टाके मंदिराच्या पूर्वेला व दुसरे पश्चिम दिशेला,  पश्चिम दिशेकडील टाक्याला आतमध्ये मंदिराच्या दिशेने 20 ते 25 फुटाची कपार होती,  दोन्ही टाक्याच्या पाण्यावर बारीक हिरवे शेवाळ असते,  त्यामुळे पाणी शुद्ध राहते,  एक आख्यायिका सांगितली जायची,  पलीकडच्या टाक्यात लिंबू टाकले तर ते दुसऱ्या टाक्यात निघते, असो, 

    साधारणतः 1965 च्या दरम्यान दुष्काळ पडला,  डोंगरावर पाण्याचा उपसा जास्त असल्याने पाण्याची कमतरता जाणवू लागली होती,  बाबाजींनी भविष्यात अडचण येऊ नये म्हणून दूर दृष्टीने पूर्व दिशेला एक टाके खोदण्याचा निर्णय घेतला,

पहिल्या पाण्याच्या टाक्या शेजारीच बाबाजी यांनीअंदाजे  साधरणतः वीस बावीस फूट खोल,   तीस बाय  पंचवीसचे टाके श्रमदानाने खोदून घेऊन तयार करुन ठेवले,  भविष्यात पाणी साठून त्याचा वापर करता येईल,  ऐन उन्हाळ्यात हे काम पूर्ण केले होते, 

 त्याच दरम्यान एक साधू महाराज आले आणि त्यांनी टाक्याला पाणी लागण्यासाठी टाक्यात आतमध्ये बसून पूजाअर्चा व जपध्यानधारण करण्यास सुरुवात केली होती, 

दर्शनासाठी येणारे भाविक तेथे येऊन  पूजा अर्चा करुन फुले वाहून जात होते,   पूजा करणारे महात्मे यांनी पूजेसाठी नेलेले पाणी कोपऱ्यात सांडलेले होते,  आणि बाबाजी यांनी खोदलेल्या टाक्याला मंत्राच्या बळावर पाणी लागत आहे,  अशी अफ़वा पसरविली जात होती , 

ही गोष्ट बाबाजी यांना आजिबात आवडली नाही,  कारण त्यांचा अंधश्रद्धेवर आजिबात विश्वास नव्हता,   

परोपकार करा,  चांगलं करा, त्याचावर विश्वास ठेवा,  सन्मार्गाने चला,  दुसऱ्याला फसवू नका

हा संत जनार्दन स्वामी यांचा साधा सरळ संदेश होता, 

 

संत गंगाबाबा तथा

आडगावचे बाबा ---

गंगाबाबा तथा आडगावचे बाबा यांच्या उल्लेखा शिवाय जातेगावच्या महादेव मंदिर जिर्णोद्दार व पुनर्निर्माण अध्यात्म पूर्ण होणार नाही,   एक संन्यस्थ वृत्ती धारण  केलेले निष्काम कर्मयोगी असलेले गंगा बाबा यांचे डोंगरावरील नवनिर्माणात फार मोठा वाटा आहे,   सन्यस्थ व्रत धारण केलेल्या गंगाबाबा यांनी तोपर्यत अनुग्रह घेतलेला नव्हता अथवा गुरु केलेले नव्हते,  या संन्याशाच्या पायाला अक्षरशः भिंगरी होती, 

चांगल्या कामासाठी सुद्धा संन्याशाने पैसे जमा करू नये हे नियम आपल्या ऋषी मुनी यांनीच करुन ठेवलेले आहेत,  त्यामुळे संत जनार्दन स्वामी अथवा संत गंगागिरी आडगावचे महाराज यांनी हे सर्व काम उभे करतांना कोणाकडूनही पैशाची मागणी केलेली नाही,  यासर्व कामासाठी वस्तुरूपाने मदत घेतली जात होती, गंगागिरी बाबा

डोंगरावर चालू असलेल्या  कामाची माहिती घेऊन,  गरज असलेल्या वस्तू जमा करणेसाठी व मिळविणेसाठी सारखे फिरत होते, 

डोंगरावरील मंदिराच्या कोटाच्या पूर्वेकडील भिंती लगत, कमानी जवळ त्यांची कुटी होती,  मात्र ते डोंगरावर अथवा कुटीत भक्तांना क्वचित भेटत अथवा दर्शन देत,

 शिवभक्त यांचेमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग होता,  विशेषतः चाळीसगाव व खान्देशात मोठा भक्त परिवार होता, संत जनार्दन स्वामी यांनी हाती घेतलेले मंदिर जिर्णोद्दार व त्याठिकाणच्या नवनिर्माणाचा ध्यास त्यांनी घेतलेला होता, त्यासाठी वस्तू रूपाने मदत मिळविणेसाठी औरंगाबाद जिल्हा, जळगाव जिल्हा वगैरे ठिकाणाचे काही गावात समक्ष जाऊन वस्तू रूपाने मदत मिळवीत होते,  मदतीत धान्य,  सिमेंट, पत्रे,  गूळ भेल्या अथवा आवश्यक त्या वस्तूंची मदत मिळवून त्यांचेमार्फतच डोंगरावर पोहच केल्या जात होत्या, 

अध्यात्माची ही चळवळ गावागावात पोहचविण्याचे फार मोठे काम त्यावेळी गंगाबाबा यांनी केले आहे,  ही वास्तवता आहे, 

बऱ्याच वेळेला गंगाबाबा रात्री उशिराने दौऱ्यावरून जातेगावी आले तर रात्री मुक्कामा साठी आमचे घरीच थांबत असत, 

गंगाबाबा आल्याचे समजताच त्यांच्या दर्शनासाठी गावातील नागरिक महिला यांची गर्दी होत असे, 

सकाळी डोंगरावर जाण्यासाठी निघालेल्या गंगाबाबांना शाळेपर्यत जाईपर्यत रस्त्यात दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना दर्शन देऊनच पुढे वाट काढावी लागत होती, 

त्यांचे नवनिर्माणातील आणि मंदिर उभारणीतील योगदान खूपच महत्वपूर्ण व अधीरेखित आहे,  याबरोबरच धर्म प्रचार व प्रसार करुन त्यांनी धर्माची व अध्यात्माची ज्योत तेवत  ठेवली होती,  संन्याशाला कसलेही पाश व  अपेक्षा नसल्याने सातत्याने  दिवस रात्र हे काम तडीस नेण्यासाठी  शक्य असेल तर वाहनाने अथवा पायीच फिरून वस्तुरूपाने मदत मिळवीत होते, 

दरम्यान डोंगरावर विविध कामे आकार घेत होते ,  काही पूर्णत्वास जात होते, 

पूर्वेकडील टाक्यावर खाली जाण्यासाठी खूपच अवघड वाट होती,  जनार्दन स्वामी यांनी दीपमाळ ते खाली टाक्यापर्यत मजबूत घाट बांधून घेतला,  ठिकठिकाणी भाविक यांना बसण्यासाठी जागेचे सपाटीकरण करुन घेतले,  वृक्षारोपण करुन घेऊन मोठया प्रमाणात झाडे लावली, जिथे सुशोभीकरण करणं करणे शक्य आहे तेथे ते करुन घेतले, 

दिवसेंदिवस भाविक यांची गर्दी वाढत होती, श्रद्धा ठेवून काही भाविक रुग्नांना त्याठिकाणी घेऊन काही कालावधीसाठी थांबत असत,  त्यासर्वांची निवासाची व्यवस्था केली जात होती ,  व्यावसायिक यांचे धंदे बऱ्यापैकी तेजीत चालत होते, 

बाबाजी यांच्या नावाने अंगठ्या,  गळ्यातील लॉकेट,  दोरे बाजारात आले होते,  त्याची मोठया प्रमाणात विक्री डोंगरावर केली जात होती, 

बाबाजी यांचे नांदगाव येथील शिष्य देविदास भावसार यांनी श्री संत जनार्दन स्वामी यांची ध्यानमुद्रा असलेला आसनस्थ स्थितीतील एक फोटो विकसित केला होता, 

देविदास भावसार स्वतः फ्रेम मेकरचे व्यावसायिक असल्याने,  व बाबाजी यांचे शिष्य असल्याने भाविक यांना उपलब्ध करुन दिला होता,  सुरुवातीला हिच प्रतिमा प्रत्येक गावात घराघरांत लागलेली होती, 

प्रतिमेचे स्वरूप,,,,,,,,,,

बाबाजी यांचे फोटोचे दोन्ही बाजूला खालील प्रमाणे मजकूर होता,

श्री पिनाकेश्वराय नमः

श्री नागेश्वराय नमः

श्री निळकंठेश्वराय नमः

श्री ह्रदयेश्वराय नमः

वगैरे, व  खाली

श्री संत जनार्दन स्वामी तथा मौनगिरी महाराज

असा उल्लेख असलेले फोटो वितरित झाले होते,  

याठिकाणी हा उल्लेख व माहिती अगदी जाणून बुजून दिली आहे,

मात्र जनार्दन स्वामी जातेगांव येथून वेरूळ,  नाशिक,  त्रंबकेश्वर ,  कोपरगाव वगैरे ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी शिवमंदिराची उभारणी करुन शिवधर्माची ज्योत तेवत ठेवली, 

त्या त्या ठिकाणी गेल्यानंतर,  बाबाजी यांचे वेगवेगळे फोटो,  प्रतिमा विकसित केल्या,  मात्र  बाबाजी यांचे प्रतिमेवरुन श्री पिनाकेश्वर हे नाव हटविण्यात आले आहे, 

ही गोष्ट केवळ जातेगावकरच नाही तर तमाम पंचक्रोशीतील शिवभक्त यांना खटकणारी व वेदना देणारी आहे, 

श्री शिवाने अशी बुद्धी  द्यावी  !!

पिनाकेश्वर,  घृष्णेश्वर,  नागेश्वर,  ह्र्दयेश्वर,  त्र्यंबकेश्वर,  काशीविश्वेश्वर ही  महादेवाची अलग अलग नावे असली तरी शिवरूप एकच आहे, ????️ नमः शिवाय, 

 

श्री संत जनार्दन स्वामी यांचे ठायी अध्यात्मिक व दैवी शक्ती होती,  एक अवतारी पुरुष होते,  महादेवाचे डोंगरावर आले तेच ईश्वरी संकेतानुसार शिवमंदिराचे जीर्णोद्धार  व नवनिर्माण यासाठी,  अध्यात्म आणि धार्मिक स्थाने म्हटल्या नंतर त्याठिकाणी कपोलकल्पित कथा आणि अंधश्रध्दा आलीच,   मात्र आपल्या वाणीतून आणि कृतीतून त्यांनी पहिला वार अंधश्रद्धेवरच केला, 

महादेवाचे डोंगरावर रात्री कोणीही मुक्कामास थांबत नव्हते,  याबाबद अनेक गोष्टी सांगितल्या जायच्या,  मात्र संन्याशाला भीती ती कसली?

लोकांतातुन एकांतात व एकांतातून धर्म जागृती साठी पुन्हा लोकांतात आलेलाच खरा संन्याशी असतो, 

बाबाजी त्याठिकाणी थांबू लागले,  बाबाजी यांनी जातेगांव ग्रामस्थ यांचेशी चर्चा करुन कामाला सुरुवात केली होती,  मंदिराच्या बाजूच्या कोटाच्या भिंतीची बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली होती,  त्याही नव्याने बांधण्याचा निर्णय घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली होती,  मंदिराच्या दक्षिण दिशेला, उजव्या बाजूला ,  कोटाच्या आतमध्ये चार पाच उंचवटे असलेल्या, पडझड झालेल्या समाध्या होत्या,  त्या त्याठिकाणी पूर्वीच्या काळी वास्तव्यास असलेल्या ऋषीं ,  संत वा तपस्वी यांच्या असू शकतील, 

मंदिराच्या जिर्णोद्दारास सुरुवात करतांना बाबाजी यांनी त्या समाध्या उकरून तेथील जागा सपाट करुन घेतली,   समाधीचे जागेवर काही ठिकाणी वारूळ व सर्प प्राणी यांनी घर केलेले होते,  समाधीचे खोदकाम केल्यानंतर त्याठिकाणी काही जागेत हाडाचे सांगाडे मिळून आले होते,  

मंदिराचे काम प्रगती पथावर चालले होते,  त्याच दरम्यान सभामंडपाचे काम सुरु होते ,  डोंगरावर सगळीकडे कामाची लगबग चालू होती, सर्व भक्त झटत होते,  बाबाजी यांचा आदेश मानीत होते,  त्यांचे दर्शन व प्रवचन याचा लाभ घेत होते,  कधी कधी बाबाजी काही दिवसासाठी मौन धारण करुन फक्त तपश्चर्या करीत होते,  नियमितपणे अनुष्ठान केले जात होते,  हजारो भक्तांनी बाबाजी यांचा अनुग्रह घेऊन शिष्यत्व पत्करले होते,  सगळीकडे मांगल्य आणि पावित्र्य याचा धूर निघत होता,  जातेगावचे ग्रामस्थ पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सर्व प्रकारची मदत पोहचवीत होते, काही भक्त,  शाळकरी पोर,  युवक महिला यांनी त्याठिकाणी थांबून स्वतःला शिव सेवा व बाबाजी यांची सानिध्य सेवा यासाठी वाहून घेतले होते, 

बळीराम मिस्त्री यांनी अत्यंत कुशलतेने मंदिराचे काम पूर्ण केले होते,  सभा मंडप ओट्याचे काम झाले होते,  लक्ष्मी व गणपती मंदिर यांचे काम पूर्णत्वास जात होते, 

त्यावेळी बाबाजी यांनी जातेगांव येथील ग्रामस्थ यांना डोंगरावर बोलावून घेतले,  व मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा कार्यासंबंधी निर्णय घेतला,  त्यानुसार कै,  एकनाथ जोशी तथा नाथू भट  यांना बोलावून त्यांचे कडून प्राणप्रतिष्ठा करणेसाठी दिवस व मुहूर्त काढून  दि,  22 नोव्हेंबर 1968 ते  दि ,  26 नोव्हेंबर 1968 या चार दिवसात  प्राणप्रतिष्ठा करण्याचे ठरविण्यात आले होते,  

त्यानुसार   जातेगांव येथील ग्रामस्थ यांनी मिटिंग घेऊन मूर्ती साठी निधी जमा करुन श्री जगन्नाथ बाबा यांचे नेतृत्वाखाली  15 ते 20 शिवभक्त यांची टीम श्री काशी व जयपूर येथे रवाना झाली होती, 

भव्य अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची प्राथमिक तयारी चालू झाली होती, भव्य दिव्य होणाऱ्या धर्म आहुती सोहळ्यात सर्व जण समर्पण भावनेने कार्यरत होते,  प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची

सर्व भाविक भावुक होऊन वाट पहात होते!!

धार्मिक झंजावात सुरु होता! ते ऐतिहासिक आणि अध्यात्मिक क्षण ज्यांनी याची देही याची डोळा,  बघितले,  अनुभवले त्याबद्दल काय लिहावे -----?

 

जातेगांव डोंगरावरील मोठा महादेव हे स्थान अत्यन्त प्राचीन असून ते स्थापित नाही,  ते स्वयंभू आहे,  तेथील सर्वच व्यवस्था जातेगावकर यांचेकडेच आहे,

तेथील पूजेचे अधिकार कै,  गंगाधर मुरलीधर भगत ( पवार ) याचेकडे वारसाहक्काने असून सद्या श्री पंढरीनाथ गंगाधर भगत हे त्याठिकाणी पूजा बांधतात, 

मोठा महादेवाला पिनाकेश्वर असेही नामनिधान आहे, 

शिवलीलामृत ग्रंथात पिनाकपाणी असा शब्द प्रयोग आहे, 

पिनाकपाणी =शंकर,  महादेव असा दृढ अर्थ आहे,   दृढ अर्थाने पिनाकपाणेश्वर याचा अपभ्रंश पिनाकेश्वर झाला आहे,  पिनाक याचा अर्थ धनुर्धारी असाही आहे,   असो, 

ते काहीही असले तरी हिंदुस्थानात पिनाकेश्वर या नावाने  हे एकमेव शिवाचे जाज्वल्य व जागृत स्थान आहे,  

त्याच पिनाकेश्वराच्या मंदिराचा  जिर्णोद्दार करण्याचे महान अध्यात्मिक कार्य सम्पन्न केले होते,  22 नोव्हेंबर 1968 ते 26 नोव्हेंबर 1968 या चार दिवसाच्या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली होती ,  काशी आणि जयपूर येथून भकांचे मार्फत मुर्त्या डोंगरावर पोहोच झाल्या होत्या,  पूजेसाठी त्र्यंबकेश्वर येथून 15ते 20 ब्राम्हण पुरोहित यांचेवर आणून त्यांचेवर ती जबाबदारी देण्यात आली होती,  21 दाम्पत्य पूजेसाठी बसविण्यात आले होते,  दररोज भाविक पूजेचा लाभ घेत होते,  प्रत्येक दिवशी गर्दी वाढत होती,  मोठया प्रमाणात कराव्या लागणाऱ्या महाप्रसादासाठी सगळीकडून मदतीचा ओघ चालू होता, 

मंत्रोपच्चाराने परिसर दुमदुमून गेला होता,   पूर्णाहुती यज्ञ पेटविला गेला,  त्यात समिधा पडत होत्या, लाखो शिव भक्तांनी यज्ञात आहुती देऊन पुण्य कमविले होते,  नियोजित जागेवर श्री गणेश,  लक्ष्मी सरस्वती यांच्या मुर्त्या स्थापित करण्यात आल्या,  शिवलिंग जुनी स्वयंभू पिंड कायम ठेवून त्याच ठिकाणी स्थापित करण्यात आली, 

26 नोव्हेंबर 1968 ला अंदाजे तीन ते चार लाख भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला,   महाप्रसादासाठी मसालेभात आणि बुंदी करण्यात आली होती,  त्यादिवशी सगळीकडे भक्तीचा महापूर ओसंडून वाहत होता,  सगळीकडे अर्थात डोंगराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यावर फक्त शिवभक्त आणि हरहर महादेव हाच जयघोष घुमत होता,  सगळीकडे आनंदाचे भरते आले होते,  सर्व विधिवत शास्र संगीत पूजेद्वारे मूर्तीची व शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा झा?

ऑनलाईन दर्शन

मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

दैनंदिन कार्यक्रमांचे वेळापत्रक

  • पहाटे
    5:33 AM - 6:30 AM

    -

  • सकाळी
    7:00 PM - 8:00 AM

    -

  • सकाळी
    8:00 AM - 10:00 AM

    -

  • सकाळी
    10:30 AM - 1:00 PM

    -

  • दुपारी
    3:00 PM - 5:00 PM

    -

  • रात्री
    8:00 PM - 10:00 PM

    -