श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर बद्दल
नाशिक जिल्ह्यात नांदगाव तालुक्यातील जातेगांव पासून उत्तरेला वनक्षेत्राकडे सरासरी 6-7 कि.मी. अंतरावर डोंगरावरील श्री पिनाकेश्वर (मोठा) महादेव देवस्थान आहे. हे स्थान नाशिक, औरंगाबाद आणि जळगांव या तीन जिल्ह्यांतील सीमाभागातील सातमाळा पर्वतरांगेत आहे. या देवस्थानाच्या पूूूर्व दिशेला औरंगाबाद जिल्ह्यातील पेडका हा छोटेखानी किल्ला असलेला डोंगर नजरेस पडतो तोच दख्खनच्या पठाराचा प्रवेशमार्ग, ईशान्येस गौताळा अभयारण्य ,पितळखोरा लेणी, उत्तरेला यादवकालीन राजदेहरे/ ढेरीचा किल्ला असून तो जळगांव जिल्ह्यातील सीमाभागात आहे.
नाशिक सीमाभागासह खान्देश,मराठवाड्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान हे डोंगरावरील पिनाकेश्वर आहे. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. तिसऱ्या श्रावण सोमवारी लाखो शिवभक्त विविध नद्यांचे व जलाशयांचे पाणी कावडीने पायी चालत घेऊन येतात व येथे जलाभिषेक करतात. भाविक मोठ्या श्रद्धेने नवस फेडण्यासाठी दाळ -बट्टी किंवा रोडग्याचा नैवेद्य महादेवास अर्पण करतात. संस्थानच्या वतीने, भाविकांच्या वतीने विशाल महाप्रसाद व भंडारा आयोजन केले जाते.
सन 1961-62 च्या सुमारास राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचे आगमन झाले.सन 1963 मध्ये येथील प्राचीन भग्न मंदिराच्या जीर्णोद्धाराचे प्रथम कार्य सद्गुरू जनार्दन स्वामी यांनी सुरु केले .शिवभक्तांना श्रमदानाचे महत्त्व सांगितले . स्वामींच्या प्रेरणेने समस्त शिवभक्तांनी श्रमदानातून मंदिराचे काम पूर्ण केले . सन 1967 मध्ये जनार्दन स्वामींनी मंदिरात नवीन मूर्तींची विधीवत प्राणप्रतिष्ठा करून या देवस्थानाच्या जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण केला . सन 1968 साली ब्र. गंगागिरी महाराजांनी सभामंडपाचे कार्य पूर्ण केले.
डोंगरावरील पिनाकेश्वर महादेवाच्या मंदिरकडे जातांना अगोदर शिवकालीन पाण्याचे टाके आहे. पूढेच थोड्या अंतरावर मुख्य मंदीर आहे. हे मंदिर हेमाडपंथी पध्दतीचे असून पूर्णपणे दगडाचे बांधकाम आहे . सद्यस्थितीत संपूर्ण मंदिरास रंग देण्यात आला आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या शिखरावरील भागावर पूर्वेस शिवपार्वती, पश्चिमेला दत्तात्रय, उत्तरेस गरुडराज आणि दक्षिणेला हनुमान स्थित आहेत तसेच किर्तीमुख ,यक्ष, नाग, किन्नर यांच्या प्रतिमा मंदिर शिखराला शोभा आणतात. तसेच मंदिरावर चहूबाजूंनी अलंकृत अशी मुंडमाला महाकाल महेश्वराचे स्थान दर्शवतात.मंदिराच्या सभागृहात मोठा नंदी आहे. या नंदी समोरच यज्ञकुंड आहे. सभागृहातील खांबांची रचना आकर्षक आहे पूढे गेल्यास उजव्या बाजूला लक्ष्मीमातेची हातात कमलपूष्प घेतलेली सुबक मूर्ती आहे. डाव्या बाजूलाच श्री गणेशाची मोहक मूर्ती प्रफुल्लित करते . मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केल्यास काळ्या संगमरवराचे भव्यशिवलिंगाचे दर्शन होते . शिवलिंगा जवळच पार्वतीमातेची भव्य मूर्ती आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूंनी जाण्या - येण्याचा रस्ता आहे. मंदिराच्या भोवती संरक्षक भिंती बांधलेल्या आहेत.मंदिरा समोरच उजव्या बाजूला दीपमाळ आहे. दरवर्षी चैत्र कृष्ण नवमीला ती पेटविली जाते. जवळच जनार्दन स्वामी आणि गंगागिरी महाराजांची मंदिरे आहेत. मंदिराच्या पूर्वेस गेल्यास आणखी काही शिवकालीन पाण्याचे टाके दिसून येतात. श्रावणात संपूर्ण डोंगर परिसर हिरवाईने नटलेला असतो .
'पिनाक' हे भगवान शंकराचे नाव असून शंकराच्या अमोघ धनुष्याशी संबंधित हे नाव आढळून येते. पिनाक हे विनाशक अस्त्र समजले जाते . कष्ट, पिडा, संकटांचा नाश करणारा तो पिनाक असे म्हटल्यास उचित ठरेल .विविध ग्रंथातून पिनाक नावाचा उल्लेख दिसून येतो . पिनाक, पिनाकैय,पिनाकेश, पिनाकिन, पिनाकपाणैय, पिनाकपाणी आदी.
* यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय ।
दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै 'य'काराय नमःशिवाय ।।
(पंचाक्षरी मंत्र)
* तथा समक्षं दहता मनोमवं पिनाकिना भग्नमनोरथा सती।
( कालिदासकृत कुमारसंभव, पाचवा सर्ग )
* पिनाकपाणैय बालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता
तथापि भव ते मूर्तीरपवर्गानुसारिणी
(छत्रपती शंभूराजेकृत, बुधभूषण)
असे अनेक 'पिनाक' नावाशी संबंधित संदर्भ आढळून येतात.
पिनाक मल्टीबेरल राॅकेट लाॅन्च (MBRL) ही अत्याधुनिक यंत्रणा आपल्या भारतीय सैन्यदलात कार्यरत असल्याचा खरोखरच अभिमान वाटतो .पिनाक ही भारतीय लष्करात असलेली एक मल्टीबेरल रॉकेट लॉन्च (एमबीआरएल) प्रणाली आहे. १९८६ मध्ये ही प्रणाली संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केली आहे. पिनाक उत्कृष्ट लढाऊ कामगिरी देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून ४४ सेकंदात १२ राॅकेट्स उडवू शकते .
पिनाकेश्वर महादेव देवस्थान हे अतिप्राचीन असून या संदर्भात विविध आख्यायिका प्रसिद्ध आहेत . याच स्थानी प्रभू रामचंद्रांनी वनवासात असताना लिंगस्थापून शिवपूजा केली . महादेवांनी प्रसन्न होऊन 'पिनाक 'अस्र रामचंद्रांना दिले .त्यामुळे हे स्थान पिनाकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. काशिखंडातील अध्यायाधारे ,एकदा शिवपार्वती सारीपाट खेळत असताना पार्वतीमातेने डाव जिंकला. म्हणून भगवान महादेव रागावले. आणि याच डोंगरावर येऊन ध्यानस्थ झाले शिवविरहात दुःखी झालेल्या पार्वतीमातेने त्यांचा शोध घेण्यासाठी भिल्लीनीचा वेश धारण करून महादेवास वश केले याच पवित्र स्थानी शिवशक्ती मिलन झाले शिवशक्ती चा पुनर्विवाह झाला तोच दिवस होता चैत्र कृष्ण नवमीचा. औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर येथील दाक्षायणी मातेस मूळ म्हणून गावात आणले जाते. मोठ्या उत्साहात शिवशक्ती विवाह परंपरेप्रमाणे साजरी करण्यात येतो. प्रत्येक वर्षी शिवशक्ती विवाहोत्सवाचे आयोजन करणारे जातेगांव हे भूतलावरील एकमेव स्थान असेल हे नक्की !!!
घाटमाथ्यावर डौलदार गांव जातेगांव त्याचे नाव
जप, तप सेवाभाव मोठे महादेव रक्षितात हे गाव
डोंगर शिखरी मोठा डोंगर तोची हा पिनाकेश्वर
झाडे, झुडूपे,पक्षी,वनचर जणू सांगे येथेची ईश्वर
बघूनी या डोंगरा छाती फुलते या अभिमानाने
लिंगस्थापूनी भक्तीने शिव प्रसन्न केले श्रीरामाने
परम शिवभक्तीने हरपले श्रीरामचंद्रांचे भान
प्रसन्न त्रिलोचनाने दिले पिनाक नावाचे बाण
दर्शन देत पिनाकहस्ताने अंश ठेवून शिवलिंगात
होईल पिनाकेश्वर महादेव स्थान भक्तांच्या हृदयात
येथेच झाले शिवशक्तीचे दिव्य अनुपम्य मिलन
अजूनही घडतो शिवविवाह भारावूनी जाती नयन
शिवनामाची लागते चाहूल दरी, खोरी, डोंगरी
जय जय शंकर जय पिनाकेश्वर गजर या नगरी
येथे सुमारे तीनशे वर्षांपासून यात्रेची परंपरा आहे. चैत्र कृष्ण नवमीला डोंगरावरील पिनाकेश्वर मंदिराची आकर्षक सजावट करण्यात येते. शिवलिंगावर परंपरागत शिवाचा आकर्षक मुखवटा स्थापित करुन अभिषेक केला जातो. मानाच्या व्यक्तींकडून पूजा केली जाते .दंडवत नावाचे व्रत करणारे भाविक आणि विविध ठिकाणाहून भाविकांनी आणलेल्या उंच काठ्यांची - कावडीची मिरवणूक नृत्य व शिवघोष करीत मंदीर परिसरात काढली जाते. प्रदक्षिणा घालत असताना रेवड्यांची उधळण केली जाते. कावड आणि काठ्यांना मंदिरावरील कळसाला स्पर्श केल्यानंतर आरती-स्तवन गायले जाते. पिनाकेश्वर गजरात डोंगर परिसरासह आसमंत दुमदुमून जातो. सूर्यास्तसमयी पवित्र दिपमाळ पेटविण्याचा मान भिल्ल समाजातील शिवभक्तांना परंपरेप्रमाणे मिळतो. पिनाकेश्वराचा मुखवटा गावाकडे आणण्याअगोदर पूरातन पाण्याच्या टाक्यात स्वच्छ केला जातो त्यानंतर हा मुखवटा गावात आणण्याचा मान गावातील माळी समाजातील यादव कुटुंबीयांकडे आहे.हा मुखवटा मानकरी आपल्या पोटास बांधून पूरातन वेशीतून गावातील पिनाकेश्वर मंदीरात आणतात . पिनाकेश्वराची विधीवत पूजा करुन मुखवट्यास अलंकृत करुन सजावट केली जाते . तसेच उर्वरित पूजाविधी करुन आकर्षक सजावट केलेल्या पालखीमध्ये मुखवटा स्थापित केला जातो आकर्षक रंगीत रोषणाई व गजराने परिसर प्रफुल्लित होतो.
गंध शुभ्र चाफा
ओढ उंबरपाना
भक्तीमयी चैत्रा
साद पिनाकेश्वर
तेजोपित धरती
नीलकंठी नीलांबर
आसमंत दिगंता
नाद पिनाकेश्वर
करुणाकरा पूढे
भक्तराज नंदी
भक्तीमय रंगी
रंग पिनाकेश्वर
केसरी रामध्वज
राममय शंभो
मोठा श्री महादेव
नाम पिनाकेश्वर
चैत्र कृष्ण नवमी
अलौकिक पर्व
अंबशंभू द्वारी
देही पिनाकेश्वर
नटराज शिव हि नृत्य कलेची देवता म्हणून संबोधली जाते. शिवाचे तांडवनृत्य आपल्या परिचयाचे आहेच .या उत्सवातील आकर्षण नृत्य असल्याचे दिसून येते . याच उत्सवात विविध संगीत वाद्यांसह मातंग,मुस्लीम समाजातील भाविक कलाकार उपस्थितांना मंत्रमुग्ध करतात. पवित्र उंच काठ्या - कावड घेऊन ढोल, ताशा, सनईच्या गजरात भाविक नृत्य करतात .याच काठ्यांमध्ये एक महत्त्वाची काठी असते, तिलाच भाविक ' रामकाठी ' म्हणतात. तिच्या खालील बाजूस ऐटपणे विराजित पितळाचा नंदी आहे . याच काठीची मिरवणूक गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशीही गावात काढली जाते. पितळी नंदीवर जलाभिषेक करून नंदी खाली लहान बालकांना स्नान घातल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहते अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे .
पिनाकेश्वराच्या पालखी समोर मोठ्या स्वरुपात दिवे, कापूर, सुगंधीत धुप यामुळे वातावरण चैतन्यमय भासते. रात्रभर पालखी दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ लागलेली असते. भाविक नवसपूर्तीसाठी पालखीवर रेवड्यांची उधळण करतात तसेच काही भाविक रेवड्या, पेढे व गुळाचा प्रसाद वाटप करतात .पालखीच्या मागील भागात वारकरी टाळ-मृदुंगासह जयघोष करतात तसेच मुख्य विठ्ठल मंदिर चौकात भारूडांचा कार्यक्रम करतात. रात्रीपासून ते सकाळपर्यंत संपूर्ण गावात पालखीचे पूजन भाविकवृंद करतात.
सकाळी गावातील महादेव मंदिराजवळ पालखीचे पूजन -मंत्रोच्चारण- आरती करून सांगता करण्यात येते . याच यात्रेची सुरुवात विशेषतः चैत्र कृष्ण पंचमीला दंडवती पासून सुरू होते . 'दंडवत' म्हणजे प्रणाम /नमन /नमस्कार किंवा भक्तिभावाने केलेले वंदन असते .दंडवतीची परंपरा फार वर्षांपासूनची सुरू आहे .दंडवतीचे स्वरुप व्रतासारखे आहे पाच दिवस शिवनामाचे स्मरण तसेच काही पथ्ये पाळावी लागतात , 10 वर्षाच्या मुलांपासून ते 50 वर्षा पर्यंतचे भाविक दंडवत करु शकतात. शर्ट -बनियन परिधान न करणे, पाच दिवस प्रत्येक दिवशी चाफ्याची माळ धारण करणे या सारखे अनेक नियम आहेत. दंडवतीच्या पहील्या दिवसा पासून ते पाचव्या दिवसा पर्यंत याचे पालन करावे लागते . पाचही दिवस डोंगराकडे ठराविक अंतराने जय घोषात जावे लागते.
पाच दिवस करी
दंडवत गावची पोरं
तिमीर डोंगरा घूमवी
महादेव नावाचं वारं
गाव यात्रेत गरजते
लय ताल न्यारी
होई बेभान धूंद
गावची भक्त सारी
शिव पालखीची आस
लागते बालगोपाळा
म्हणत नाही कुणी
शिस्त तुम्ही पाळा
शिवाचे रूप वाटे मला
जसे सगुण साकार
आजी आजोबा सांगे
माहादेवचं गावचा आधार !!
चैत्र कृष्ण नवमी नंतर म्हणजेच यात्रेच्या तिसर्या दिवशी गावात कुस्तींची दंगल आयोजित करण्यात येते. अशा प्रकारे यात्रा काळाचा समारोप होतो.
महाशिवरात्री , चैत्र कृष्ण नवमी आणि श्रावण सोमवारी या हिंदू -मुस्लिम धर्माचे भाविक सहभागी होऊन धार्मिक सलोखा ठेवण्याचे महत्वपूर्ण योगदान देतात . सर्वधर्मीय ऐक्याचे प्रतिक आपल्याला येथे दिसून येते .
संत एकनाथ महाराजांनी देवाच्या अभिषेकासाठी काशीहून कावडीने आणलेले पाणी तहानेने व्याकुळलेल्या गाढवास पिण्यास देऊन भूतदयेचा आदर्श घालून दिला, अशी कथा आपण नेहमी ऐकतो. यावरून कावड यात्रेची परंपरा किती प्राचीन आहे, याची प्रचिती येऊ शकते. दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी लाखो भाविक शिवदर्शन , अभिषेकासाठी या पावन स्थानी येतात. महाराष्ट्रातील पवित्र नदी, जलाशयाचे पाणी घेऊन भाविक मनोभावे कावड यात्रेत सहभागी होऊन नवस करतात. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फलाहार, आदी व्यवस्था करण्यात येते .मात्र या वर्षी कोरोना विषाणूच्या व्याप्तीमुळे हे चित्र दिसणार नाही.श्रावण महिन्यातील तिसर्या सोमवारी लाखो भाविकांसाठी येथील पिनाकेश्वर संस्थान,पोलिस प्रशासन , वनविभाग ,ग्रामपंचायत आदी देखरेख ठेवून सज्ज असतात .जातेगांव येथे येण्यासाठी नांदगाव, मालेगांव, चाळीसगाव, वैजापूर, कन्नड ,औरंगाबाद आदी आगाराच्या बस उपलब्ध असतात. असे हे डोंगरावरील पिनाकेश्वर महादेव देवस्थान विकासाच्या प्रतिक्षेत जरी असले तरीही आपण श्रावण मासातील शिवदर्शन आणि येथील नैसर्गिक अनुभुतीचे साक्षीदार होणे तरी महत्त्वाचे ठरेल .!!!
- ईश्वर जाधव